Breaking

स्वप्ने मोठी पहा, प्रशासन दिव्यांगांच्या सदैव पाठीशी – अंबाजोगाईत दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा आधार

Updated: जानेवारी 8, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे अंबाजोगाईत विद्यार्थ्यांना आवाहन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वर्षाखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला जाईल – मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान

अंबाजोगाईत तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव-२०२६ चे उद्घाटन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – स्वप्ने मोठी पहा, प्रशासन दिव्यांगांच्या सदैव पाठीशी उभे आहे असा भक्कम आधार बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना दिला. तर वर्षाखेरपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सांगितले. अंबाजोगाईत तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव-२०२६ चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवात बीड जिल्ह्यातील ४८ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प.बीड., जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जि.प.बीड., व सौ.सुमतीताई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा.ता.अंबाजोगाई, जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव-२०२६ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन बुधवार, दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भूषविले. तर व्यासपीठावर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी आश्विनी सोनवणे, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील, गटविकास अधिकारी बळवंत साहेब, गटशिक्षण अधिकारी मधुकर सुवर्णकार, दिनकर गुणाले (सचिव, सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा, ता.अंबाजोगाई.), माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ.संतोष मुंडे, श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, संचालक रमण सोनवळकर, संभाजीराव लांडे, विलास काळुंके, शेख, अशोक गंडले, ज्येष्ठ पत्रकार शिवकुमार निर्मळे, प्रा.रोहिणी पाठक, जगधने सर, सुरवसे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये उपजतच सर्वगुण संपन्नता असते. शिक्षकांनी शिल्पकाराची भूमिका बजावून त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. दिव्यांग मुलांनी आज प्रत्येक क्षेत्रात उच्च स्तर गाठला आहे. मुलांनो, स्वप्ने मोठी पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे, असे आश्वासक उद्गार काढून बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना भक्कम आधार दिला. पुढे बोलताना सांगितले की, बीड जिल्ह्यात एक दिव्यांग बांधवांची मोठी संख्या असू शकते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. दिव्यांगांना प्राधान्य देण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर कॅम्प लावून युडीआयडी कार्ड वाटप केले जाणार आहे, ज्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होईल. अडचणींवर मात करून पुढे जाण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे असेही जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी नमूद केले. व यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तुम्हाला मोठे होऊन काय व्हायचे..? असा प्रश्न विचारला असता विद्यार्थ्यांनी क्लास वन अधिकारी, पोलीस, डॉक्टर आणि चित्रकार होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात साडेपाच हजार विद्यार्थ्यांना युडीआयडी कार्ड देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दोन महिन्यांपूर्वी ५०० विद्यार्थ्यांना कार्डे दिली आहेत. शिष्यवृत्तीसाठी हे कार्ड अनिवार्य असून, या वर्षाखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला जाईल.बीड जिल्ह्याचे नांव राज्यस्तरावर नेण्याचे आवाहन ही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियाराणी पाटील (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तथा माध्यमिक शिक्षण अधिकारी, जि.प.बीड.) यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अंकुशराव नखाते (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता,‌ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प.बीड.) यांनी मानले. इतर उपस्थित मान्यवरांनी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंद घ्यावा आणि आपल्यातील कौशल्याचे प्रदर्शन करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नंतर योगेश्वरी शिक्षण संस्था परिसरातील हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व पुज्य बाबासाहेब परांजपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी संचलन पार पडले. तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. क्रीडा ज्योतचे संचलन राज्यस्तरीय पारितोषिक विजेते दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव-२०२६ च्या यशस्वितेसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जि.प.बीड, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जि.प.बीड व सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा ता.अंबाजोगाई (जि.बीड) यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेण्यात येत आहे.


Categories

Recent Posts