Breaking
Updated: जानेवारी 3, 2026
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय पुरस्काराने भागवत मसने सन्मानित
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी):- विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार २०२५-२०२६ ने अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध कवि, वात्रटिकाकार भागवत रामकृष्ण याना त्यांच्या साहीत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नुकतेच १ जानेवारी २०२६ रोजी आष्टी येथे मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. गंगाई बाबाजी पुरस्कार हा प्रतिवर्षी साहित्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच कृषी व क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो . त्यामुळे या पुरस्काराची वेगळी अशी ओळख व प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे हे पुरस्कार देण्यासाठी व्यक्ती निवडताना अतिशय तावून सलाखून त्यांची निवड करताना आढळून येतात.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे भागवत मसने हे गेल्या पंचवीस वर्षापासून साहित्यातला व्यंग, वात्रटिका प्रकार हाताळतात. शाळा, महाविद्यालयातून ते सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसवण्याचे काम करत आले आहेत. मनोरंजनातून शिक्षण व प्रबोधन हे त्यांच्या कवितेचा गाभा आहे. त्यांनी अनेक स्नेहसंमेलन, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विविध कार्यक्रमातून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे. मोबाईल सारखे भौतिक साधन वापरत असताना विद्यार्थ्यांनी, समाजाने सामाजिक भान ठेवलं पाहिजे. अशा विविध सामाजिक समस्यांना हाताळत ते मनोरंजनातून प्रबोधन करतात. एक उत्तम सूत्रसंचालक असून अनेक कवी संमेलने अनेक राजकीय सभा यांचे सूत्रसंचालन उत्तम आणि बहारदार करतात. या व अशा अन्य कार्याची दखल घेऊन गंगाई -बाबाजी पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. दिनांक एक जानेवारी २०२६ रोजी भगवान महाविद्यालय आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी भागवत मसने यांच्या सोबत श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. माणिकराव लोंमटे, जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष मेजर प्रा एस. पी. कुलकर्णी व श्री योगेश्वरी नूतन विद्यालय मंदिर विभाग प्रमुख एस.बी. शिंदे यांच्यासह मसने यांचे कुटुंबीय तथा मिञ परिवार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता.
भागवत मसने यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये साहित्य, शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराचा समावेश आहे.कोल्हापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान, शिवजागर प्रतिष्ठाण चा महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मैत्री फाउंडेशन बीडचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच आदर्श साहित्यिक पुरस्कार या पुरस्काराने भागवत मसने यांचा यापूर्वी सन्मान करण्यात आला आहे. भागवत रामकृष्ण मसने हे हिंदी विषयात एम ए बी एड असून त्यांना के. के. एम. कॉलेज मानवत येथे वाद विवाद स्पर्धेत मराठवाडा स्तरावरील स्पर्धेचे पहिले बक्षीस मिळाले. महाविद्यालयीन जीवनात वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा यामध्ये एकूण ३२ पारितोषिके मिळवली आहेत.
भागवत मसने यांनी स्वतः पाच एकांकिका व पाच गीते लिहून विद्यालयाच्या विद्यार्थी चमूद्वारे बीड आकाशवाणीवर सादर केले आहेत. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून विविध विद्यालय तथा महाविद्यालयात स्वतः हास्य व्यंगात्मक कार्यक्रम देखील सादर केले आहेत. अनेक ठिकाणी वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धेचे उत्तम असे परीक्षण करत अनेक कवी संमेलनाचे उत्तम व बहारदार असे सुत्रसंचलन करण्यात भागवत मसने यांचा हातखंडा आहे.
या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलताना माजी आमदार भिमराव धोंडे यांनी गंगाई- बाबाजी पुरस्काराबद्दल माहिती दिली. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींना वितरित केल्याचे सांगितले. २०२५-२०२६ सालचा हा पुरस्कार शिक्षणाची पंढरी तथा मराठी भाषेचे जनक आद्यकवी मुकुंदराज स्वामीं च्या पावन भूमीतील एक सामान्य कुटुंबातील एक आदर्श शिक्षक भागवत मसने यांना देतांना विशेष असा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. भागवत मसने यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होऊन शुभेच्छाचा वर्षाव केल्या जात आहे.