शिरूर : शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शनिवार दि. ७ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. आज (रविवार) दि.८ जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र या तरुणांच्या जीवन संपवण्याच्या पाठीमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिंगारवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा रामेश्वर नारायण कोळेकर (20) हा आई-वडिलांना तीन बहिणीच्या पाठीवर एकुलता एक मुलगा होता. गेल्या दहा-बारा वर्षांपासून रामेश्वरचे वडील नारायण कोळेकर हे प्रदीर्घकाल आजारी असल्याने घर चालवण्याची जबाबदारी आई शांताबाई कोळेकर व रामेश्वरवर येऊन पडली होती.
शनिवार दि.७ जून रोजी रामेश्वर हा तिंतरवणी येथील आठवडी बाजारातून जाऊन आला होता. तर आई एकादशीच्या निमित्ताने दुपारी श्री.क्षेत्र नारायण गडावर वारी निमित्त दर्शनासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई शांताबाई घरी आल्यानंतर घर उघडत नाही म्हणून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले व घरावरील पत्रे उचकून काढले असता घरामध्ये मुलगा रामेश्वर याने घरातील आडुला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले.