Breaking

बीडमध्ये छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचे धाबे दणाणले; दामिनी पथकाचा वर्षभरात २२३ ‘रोडरोमियां’ना दणका

Updated: डिसेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

दामिनी पथकाचा वर्षभरात २२३ 'रोडरोमियां'ना दणका

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : बीड शहरासह जिल्ह्यात मुलींची छेड काढणाऱ्या आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात टवाळकी करणाऱ्या रोडरोमियोंवर दामिनी पथकाने आता जबरदस्त प्रहार केला आहे. पीएसआय पल्लवी जाधव यांनी या पथकाची धुरा सांभाळल्यापासून टवाळखोरांविरुद्धच्या मोहिमेला मोठी गती मिळाली असून, एका वर्षात तब्बल २२३ रोडरोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आज बीडच्या शिवाजी विद्यालय परिसरात मुलींना नाहक त्रास देणाऱ्या १३ जणांना पथकाने रंगेहाथ पकडून चांगलाच धडा शिकवला.

आजच्या कारवाईत शिवाजी विद्यालय परिसरात गस्त घालत असताना हे १३ रोडरोमिओ मुलींची छेड काढताना आढळले. दामिनी पथकाने त्यांना तातडीने ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात मुलींची असुरक्षितता वाढवणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींविरुद्ध पोलीस आता अधिक आक्रमक झाले असून, मुलींच्या वाटेत आडवे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच या कारवाईतून देण्यात आला आहे.

केवळ कारवाईच नाही, तर दामिनी पथक जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना कायदेविषयक माहिती आणि स्वसंरक्षणाचे धडेही देत आहे. शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी जिथे मुलींची वर्दळ असते, जसे की शाळा, कॉलेजेस आणि कॉफी शॉप्स, अशा ठिकाणी हे पथक सतत गस्त घालत आहे. वर्षभरातील २२३ कारवायांमुळे मुली आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस शिपाई गजानन चौधरी आणि योगेश निर्धार यांनी यशस्वीरीत्या केली. मुलींनी कोणतीही भीती न बाळगता त्रास देणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts