Breaking

भाड्याची कार आणून विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश

Updated: डिसेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

हायटेक रॅकेटचा बीड पोलिसांनी केला 'गेम', दोघे जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हायटेक रॅकेटचा बीड पोलिसांनी केला ‘गेम’, दोघे जेरबंद

​बीड: ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कार भाड्याने घ्यायची आणि तिची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करायची, इतकेच नाही तर विक्री केलेली कार पुन्हा चोरून न्यायची… अशा एका अतिशय चतूर आणि हायटेक आंतरराज्य टोळीचा पेठ बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैद्राबाद ते नांदेड असा धागादोरा शोधत पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, या कारवाईमुळे वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​या प्रकरणाची सुरुवात पेठ बीड येथील रहिवासी तोफीक खाजा बागवान (वय ३३) यांच्या तक्रारीवरून झाली. तोफीक यांनी एक महींद्रा कंपनीची ‘XUV 700’ (क्रमांक TS 26 H5556) ही कार विकत घेतली होती. मात्र, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, ज्यांनी ही कार विकली होती, त्यांनीच त्यांच्याकडील दुसऱ्या चावीचा वापर करून ही कार पळवून नेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तोफीक यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तांत्रिक तपासाचे चक्र फिरवले.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. तपासाचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत पोहोचले. पोलिसांनी नांदेडमध्ये सापळा रचून इंद्रजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २२, रा. जुना कवठा, नांदेड) याला १७ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी मोहमद रव्यान मोहमद एजाज (वय २३, रा. मोगलपुरा, हैद्राबाद) याला तेलंगणातून अटक केली.

​तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, हे आरोपी हैद्राबाद येथील ‘लाँग ड्राईव्ह कार्स’ या कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने कार भाड्याने घेत असत. त्यानंतर त्या कारची परस्पर विक्री केली जायची. मात्र, कारचे भाडे थकल्यानंतर किंवा मुदत संपल्यानंतर संबंधित कंपनीची रिकव्हरी टीम ‘जीपीएस’च्या मदतीने कारचा शोध घेत असे आणि त्यांच्याकडील दुसऱ्या चावीने कार पुन्हा घेऊन जात असे. यामुळे खरेदीदाराला आपली कार चोरीला गेल्याचे वाटत असे, तर प्रत्यक्षात तो एका मोठ्या फसवणुकीचा बळी ठरलेला असायचा. पोलिसांनी तपासादरम्यान चोरी गेलेली कार जप्त केली आहे.

​ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नित्यानंद उबाळे, नितीन राठोड, हनुमंत उगले, कल्याण जाधव आणि आश्वीन सुरवसे यांनी केली आहे. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास पेठ बीड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जुने वाहन खरेदी करताना केवळ विश्वासावर व्यवहार न करता, कागदपत्रांची अधिकृत खात्री करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


Categories

Recent Posts