Breaking
Updated: डिसेंबर 18, 2025
अंबाजोगाईतील पाटील चौकातील थरार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पाटील चौक भागात उधारीवर कपडे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून कपड्याच्या दुकानदारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संकेत विनोद नरके (वय 21, रा. खडकपुरा, अंबाजोगाई) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. संकेत याचे पाटील चौकात कपड्याचे दुकान आहे. 16 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी पृथ्वीराज जोगदंड आणि अमन मोटेराव हे दोघे त्याच्या दुकानात आले. त्यांनी काही कपडे पसंत केले, मात्र पैसे न देता उधारीवर मागितले. संकेतने उधारी देण्यास स्पष्ट नकार दिला असता, आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेले.
काही वेळाने पृथ्वीराज आणि अमन हे त्यांचे साथीदार वीर शिंदे आणि दोनगहु (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांना घेऊन पुन्हा दुकानात आले. यावेळी पृथ्वीराजने सोबत आणलेल्या कोयत्याने संकेतच्या उजव्या भुवयीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच अमन मोटेराव याने दगड फेकून मारल्याने संकेतचा खालच्या बाजूचा एक दात तुटला. इतर साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरडा ऐकून शेजारील दुकानदार कृष्णा मुद्गुलकर, रमेश टेहरे व विशाल पाटील यांनी धाव घेत भांडण सोडवले. जखमी संकेतने दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चारही आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 117(2), 115(2), 352, 351(2) आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल गायकवाड करीत आहेत.