Breaking
Updated: डिसेंबर 3, 2025
रेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे खा.बजरंग सोनवणे यांचे अवाहन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे खा.बजरंग सोनवणे यांचे अवाहन
बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेकामाला गती मिळत असून बीडपर्यंत रेल्वे धावत आहे. आता बीड ते वडवणी रेल्वेमार्गावर इंजिनची चाचणी होणार आहे. दि.६ डिसेंबर रोजी ही चाचणी होईल, यावेळी नागरिकांनी रेल्वेमार्गावर सतर्क रहावे, असे अवाहन खा.बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्गावरील कामाला वेग मिळाल्यानंतर आता बीड-वडवणी दरम्यान इंजिन चाचणी आणि सीआरएस तपासणीची प्रक्रिया सुरू होत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून यासंदर्भात अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, नागरिकांनी ट्रॅक परिसरात सुरक्षितता पाळण्याचे कठोर आवाहन करण्यात आले आहे. नव्याने बांधलेल्या ट्रॅकवर ६ डिसेंबर २०२५ रोजी इंजिन चाचणी होणार आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून १० व ११ डिसेंबर रोजी सखोल तपासणी आणि हाय-स्पीड चाचण्या घेण्यात येणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान रेल्वे उच्च वेगाने धावणार असल्याने परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड-वडवणी परिसरातील गावकरी, शेतकरी, गुरेढोरे धारक, रस्ते वापरकर्ते, ग्रामपंचायती तसेच सरपंचांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खा.बजरंग सोनवणे यांनी केले आहे. चाचणीतील कोणताही अडथळा टाळण्यासाठी ट्रॅक परिसर पूर्णपणे मोकळा ठेवावा, असेही म्हटले आहे.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
ट्रॅकवर किंवा जवळ कोणतेही अतिक्रमण करू नये.
गुरेढोरे ट्रॅककडे भटकणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अनधिकृत ठिकाणी ट्रॅक ओलांडण्याचे प्रकार टाळावेत.
दिवसभर ट्रॅकपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
महत्त्वाच्या टप्प्याकडे बीड-वडवणी मार्ग
बीड-वडवणी विभाग सुरू करण्यापूर्वीची ही चाचणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सर्व चाचण्या सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.