Breaking
Updated: डिसेंबर 3, 2025
अखेर ऊस दराची कोंडी फुटली-शेतकऱ्यांत समाधान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशेतकरी नेते कॉ.अजित नवले, कारखानदार शेतकर्यांच्या चर्चेअंती तोडगा
बीड – ऊसाचे दर जाणीवपूर्वक पाडणाऱ्या कारखानदारांविरोधात कोयता बंद, वाहतूक बंद आंदोलन करत मागील दहा दिवसांच्या अभूतपूर्व संघर्षानंतर मंगळवार (दि 2) रोजी झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला असून शेतकरी 2775 ते 2800 रुपये पहिली उचल व अंतीम भाव हा रिवेन्यू शेरिंग फॉर्मुल्या अंतर्गत शेवटी देण्याचे कारखानदारांनी कबूल केले.किसान सभेचे नेते कॉ.अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह साखर कारखान्याचे संचालक, युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्या बैठकीतुन हा तोडगा निघाला असून शेतकऱ्यांचे अभूतपूर्व यश आहे. या यशात रात्रभर गस्त देऊन ऊस वाहतूक बंद ठेवायला भाग पाडणारे तरुण कार्यकर्ते, युवक आणि हे आंदोलन दिशाहीन न होऊ देता योग्य दिशेला घेऊन जाणारे योग्य नेतृत्व या समन्वयातून लढा यशस्वी करण्यात आला.
तोडणी व वाहतूक दर समान असताना, इतर गाळप खर्च समान असताना, पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस दरात व मराठवाड्यातील ऊसतरात 1000 ते 1300 रुपयाची तफावत होती. साखर उताऱ्यातील एक-दीड टक्का तफावत लक्षात घेता हा भावातील फरक 500 रुपयांच्या आत असायला हवा होता. मात्र प्रति टन उसामागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची लूट सुरू होती.सन 2025-26 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येक टनासाठी 3555 रु. दर 10.25 रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपणाकडे 11 किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेता प्रती टन 3 हजार रू. पहिली उचल तर 4 हजार रु. अंतिम दर मिळाला पाहीजे ही मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीने लावून धरली.दि 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील शेकडो गावात टायर जाळून या आंदोलनास सुरुवात झाली.दि 24 रोजी माजलगाव या ठिकाणी करण्यात आलेला चक्काजाम आंदोलन, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार यांच्याशी झालेली यशस्वी बैठक, प्रत्येक साखर कारखाने यांना निवेदन करून करण्यात आलेली मागणी, परभणी जिल्ह्यातील सायखेडा, मानवत, पाथरी आदी ठिकाणी करण्यात आलेले ठिय्या आंदोलन, चक्काजाम आंदोलन असे मागील 10 दिवसापासून हे आंदोलन सुरू होते.
ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, ग्राम पंचायत, सोसायटी यांचा पाठींबा
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी या आंदोलनास जबरदस्त पाठींबा दिला. शेतीतील ऊस तोडणी थांबवून या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते याच बरोबरीने ऊस तोड कामगार व वाहतूक संघटना यांनी देखील या आंदोलनास पाठींबा देत ऊस तोडणी आणि ऊस वाहतून बंद ठेवली होती.तर जिल्ह्यातील शेकडो ग्राम पंचायतीने व सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव घेत या आंदोलनात पाठींबा दिला होता.
आंदोलकांवर दबाव मात्र आंदोलन तीव्र
विविध ठिकाणी करण्यात आलेले चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांना या आंदोलनाचे गांभीर्य पटवून देणाऱ्या असंख्य आंदोलनकर्त्यावर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. सायखेडा ता सोनपेठ या ठिकाणी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनकर्त्यावर बाऊसर सोडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र साखर कारखानदारांचे हे सर्व मनसुभे उधळून लावून या आंदोलनाने तीव्र स्वरूप घेतले होते.
अभ्यासू नेतृत्वाखाली शेतकरी एकजुट
कॉ.अजित नवले यासारखे किसान सभेचे प्रामाणिक, अभ्यासू व लढवय्ये अनुभवी नेतृत्व.कॉ उमेश देशमुख, कॉ.अजय बुरांडे यांच्यासह अजय राऊत, नारायण गोले, दत्ता डाके, जगदीश फरतडे कृष्णा सोळंके नामदेव सोजे तुकाराम पाटील आदींसह जिल्ह्यात शेतकरी चळवळीवरील विशेषता किसान सभेवरील दृढ झालेला विश्वास. या सर्वांचा परिपाक म्हणून लढ्याला पोषक वातावरण निर्माण झाले होते. तू मोठा की मी मोठा असे न करता सर्वांना सोबत घेऊन योग्य वेळी सर्वांच्या हितासाठी तरुण शेतकरी पुत्रांनी जीवांचे रान करून रात्री अपरात्री ही लढाई रस्त्यावर लढली .
सायखेडा येथील आंदोलन सुरूच राहणार
सायखेडा ता-सोनपेठ येथील 21 शुगर या कारखान्यासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघर्ष समिती ने दिली असून या साखर कारखान्याने आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी देखील आपला भाव जाहीर केला नसून उलट हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी बाऊन्सर आणि पोलिसी बळाचा वापर केल्याने हे आंदोलन चिघळले आहे.