केज – फुकट तंबाखू न दिल्यावरून ८२ वर्षाच्या तंबाखू विक्रेतेच्या पाठीत जोराची लाथ मारल्याने बरगडी फॅक्चर झाल्याची घटना मस्साजोग (ता. केज) येथे घडली असून एक जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग येथील शिवाजी निवृत्ती देशमुख (वय ८२) हे तंबाखू विक्रीचा व्यवसाय करीत असून ते २ जून रोजी दुपारी ४.३० वाजता गावातील मुज्यांचे पाराजवळ छोट दुकान मांडून तंबाखू विक्री करीत बसले होते. यावेळी गावातील सुनिल विष्णु भालेराव याने तंबाखू मागितली. त्यांनी किती द्यायची अशी विचारणा केली असता मी विकत घेणार नाही, अशीच दे म्हणाला. त्यांनी तुला तंबाखू देत नाही म्हणता सुनिल याने शिवीगाळ करीत त्यांच्या पाठीत जोराची लाथ मारल्याने बरगडीस जखम होऊन फॅक्चर झाली. ते मोठ्याने ओरडल्याने बाजूला असलेले संदीप देशमुख व राहुल देशमुख यांनी सोडवा सोडव केली. त्यांच्या मुलगा अमृत देशमुख यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी उपचारासाठी पत्र दिल्यानंतर त्यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढील उपचार अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात करण्यात आले. ४ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून सुनिल भालेराव याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार दत्तात्रय बिक्कड हे करीत आहेत.