Breaking

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ३६ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Updated: ऑक्टोबर 16, 2025

By Vivek Sindhu

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईचे वाटप करावे, धारूरच्या शेतकऱ्यांची मागणी

धारूर – धारूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरिप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तब्बल ३६ हजार ३१२ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शासनाकडे ३३ कोटी २८ लाख १ हजार ८६० रुपये आर्थिक मदतीची मागणी केली आहे. दिवाळी जवळ येत असताना शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असून वेळीच मदत न मिळाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्यात धारूर तालुक्यात सलग पावसाचे सत्र सुरू राहिले. कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी यांसह जिरायत, बागायत आणि फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिरायत क्षेत्रासाठी ३६ हजार ३१७ हेक्टरवर ८५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ३० कोटी ८६ लाख ९४ हजार ५०० रुपयांची, तर बागायत क्षेत्रासाठी फक्त ८८ हेक्टरवर १७ हजार प्रति हेक्टर प्रमाणे १ कोटी ५० लाख ६७१७ रुपयांची आणि १४६ हेक्टर फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ३ कोटी २८ लाख ९५ हजार रुपयांची भरपाईची मागणी प्रशासनाने शासनाकडे दाखल केली आहे. तथापि, तालुक्यात प्रत्यक्षात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असूनही केवळ ८८ हेक्टरचा आकडा शासनाला कळविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हा फरक लक्षात न घेतल्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक संच, फवारणी, बियाणे, प्रक्रिया खर्च यासाठी कर्ज घेतले आहे. पिके मातीमध्ये कुजून गेल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे आणि उत्पन्नाचा स्त्रोत कोलमडला आहे. दरम्यान, तहसील प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. मात्र यादी प्रक्रियेत होणारा विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर घालत आहे.

दिवाळीपूर्वी तरी शासन मदत करेल का? हा सवाल शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. धारूर तालुका सध्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे – एकीकडे उजाड शेती आणि दुसरीकडे मदतीची वाट पाहणारे हजारो शेतकरी. शासनाची मदत किती तातडीने होते, यावर शेतकऱ्यांच्या दिवाळीचा उजेड अवलंबून आहे . त्यामुळे अनुदान वाटप करावे अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी

“आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी नव्हे, जगण्यासाठी मदत मागत आहोत”. त्यामुळे शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अचूक सर्वेक्षण, योग्य हेक्टर नोंदणी आणि जलद आर्थिक मदतीची अंमलबजावणी करावी. यामुळे दिलासा मिळू शकेल.

• मधुकर नेहरकर शेतकरी


Categories

Recent Posts