Breaking

माळेगाव येथे तुळजाभवानी मातेच्या यात्रेत ओढल्या मानाच्या बैलगाड्या

Updated: ऑक्टोबर 7, 2025

By Vivek Sindhu

माळेगाव येथे तुळजाभवानी मातेच्या यात्रेत ओढल्या मानाच्या बैलगाड्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील माळेगाव येथे ग्रामदैवत तुळजाभवानी मातेची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी यात्रा भरली. यात्रेत लक्ष्मण लोकरे या भक्ताने नागरिकांनी भरलेल्या १२ मानाच्या बैलगाड्या ओढल्या. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
माळेगाव येथे तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे ठाण असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. घटस्थापनेपासून पंधरा दिवस विविध धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रम झाले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी यात्रा भरली होती. पहाटे देवीचे अभिषेक व अलंकार महापूजा करण्यात आली. दुपारी शेकडो महिलांनी घागर घेऊन गाड्यांना पाणी घातले. दुपारी अडीच वाजता १२ मानाच्या बैलगाड्या एकमेकांना दोरखंडाने बांधून त्यात छोटा गाडा ठेवून या बैलगाड्यात भाविक बसले. तर पाच दिवसापासून मंदिरात उपवास करीत बसलेले भक्त लक्ष्मण लोकरे यांनी ओढल्या. हा सोहळा पाहण्यासाठी बच्चेकंपनीसह महिला, तरुण, नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रात्री गावातून देवीच्या पालखीची वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तांनी पोत खेळत देवीच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांना मशाला दूध वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त देवीच्या मंदिरावर व प्रमुख रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे मंदिर परिसर उजळून गेला होता. तसेच यात्रेत खाद्यपदार्थांचे, सौंदर्य प्रसाधने व लहान मुलांच्या खेळणीचे स्टॉल लागले होते. रहाट पाळणे व इतर मनोरंजनाच्या साधनांचा आनंद यात्रेकरूंनी घेतला.


Categories

Recent Posts