Breaking
Updated: सप्टेंबर 13, 2025
बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई, सात आरोपी जेरबंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड ग्रामीण पोलिसांची कारवाई, सात आरोपी जेरबंद
बीड – जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या अपहरण प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १४ तासांत निकाल लावत अपहरण झालेल्या इसमाची सुखरूप सुटका केली. या कारवाईत सहा पुरुष आणि एक महिला आरोपींसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन विधीसंर्घष्यग्रस्त बालकांचा समावेश आहे.
१२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कल्याणनगर चऱ्हाटा फाटा, बीड येथे दिया नागनाथ नन्नवरे (रा. गोरे वस्ती, बालेपीर, बीड) हिने फिर्याद दिली की, तिचा पती नागनाथ चंद्रकांत नन्नवरे (वय ३०) याला ८ ते १० जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून पांढऱ्या बोलेरो गाडीत टाकून अपहरण केले.
गंभीर स्वरूपाच्या या तक्रारीनंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्याची दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासणी व स्थानिक तपासादरम्यान अपहरण सोनल काळे व ज्योती काळे यांनी पैशाच्या कारणावरून इतरांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. तपासाचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपी आंबी (ता. धाराशीव) परिसरात असल्याची माहिती मिळवत स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक संजय कुकलारे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन पीडिताची १४ तासांत सुखरूप सुटका केली. अटकेत घेतलेल्या आरोपींपैकी काहींवर पूर्वीचेही गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि बाळराजे दराडे, पोउपनि संजय कुकलारे, नितीन काकरवाल, सफौ भाऊसाहेब गुंड, सुंदर चव्हाण, पोह. जगदिश करांडे, मनोज जोगदंड, फिरोज पठाण, सतिष मुंडे, प्रसाद कदम, पो.अं. सचिन कापसे, गणेश कांदे (बीड ग्रामीण) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि खटावकर, सोमनाथ गायकवाड, आंनद मस्के, राहुल शिंदे, यादव, सिद्धार्थ मांजरे, मनोज परझणे, आसपाक शेख आदींनी सहभाग नोंदवला.