Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शहरातील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी रात्री उशिरा शाब्दिक वादातून झालेल्या हाणामारीत 22 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अभिषेक राम गायकवाड (वय 27, रा. काटवटवाडी, ता. बीड) या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सुनिल मारोती काळे (वय 47, व्यवसाय सलून चालक, रा. बाराभाई गल्ली धारूर, ह.मु. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा विजय (वय 22) हा कामधंदा करत नसून मित्रांसोबत वेळ घालवत असे. 2 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विजय व त्याचे मित्र अभिषेक गायकवाड, अभिषेक काशीद, विशाल यादव व इतर जण महाराणा प्रताप चौकात आले. यावेळी विजय आणि अभिषेक गायकवाड यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.
वाद चिघळताच अभिषेक गायकवाडने आपल्याजवळील धारदार चाकू काढून विजयच्या डाव्या छातीत भोसकले. गंभीर जखमी अवस्थेत विजय जमिनीवर कोसळला. त्याला आकाश कुटे व ओम लकडे यांनी मोटारसायकलवरून सरकारी दवाखान्यात आणले. मात्र, रक्तस्त्राव व खोलवरच्या जखमेने तो उपचाराआधीच मरण पावला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
या घटनेदरम्यान आरोपी अभिषेक गायकवाड घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.