केज : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या वरपगाव (ता. केज) येथील सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४५) यांचा पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळ हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लेखी आश्वासनाशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
देशमुख हे मित्रासोबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, नारायणगावजवळ त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी विजेचा शॉक लागून त्यांचा एक मुलगा दगावला होता. दुसरा मुलगा सध्या पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आता सतीश देशमुख यांच्या निधनामुळे पत्नी नंदुबाई, मुलगा आणि वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर वरपगावातील ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की, सतीश देशमुख यांच्या मुलाला सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी केज येथील नायब तहसीलदारांना दिले.
देशमुख यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी वरपगावात आणला जाणार असून या प्रकरणामुळे गावात तसेच आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उसळल्या आहेत.