केज: केज तालुक्यातील एका गावातील दोन तरुणांनी आपल्या गावातीलच अशोक दरुगे या २९ वर्षीय मजुराला अंतरवली सराटी येथे येण्यास मज्जाव केला. त्यानंतर, मोटारसायकलच्या फूटरेस्टच्या लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात अशोक दरुगे यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही हरवली आहे.
अशोक दरुगे हे वरद ट्रेडर्समध्ये मजुरीचे काम करतात. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास, विशाल अशोक थोरात आणि गणेश अशोक थोरात हे दोघे दुकानात आले. अशोक दरुगे यांनी त्यांना सांगितले की, ते उद्या अंतरवली सराटी येथे जाणार आहेत. यावर दोघांनी त्यांना तेथे येऊ नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करत फूटरेस्टच्या तुटलेल्या रॉडने त्यांच्या तोंडावर आणि डोक्यात मारहाण केली.
या हल्ल्यात दरुगे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पडली. या प्रकरणी अशोक दरुगे यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, विशाल आणि गणेश थोरात यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.