केज – केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात आला.
केज तालुक्यात चिंचोलीमाळी येथे माजी सैनिकांची संख्या सर्वाधिक असून अनेक सैनिक हे देशसेवा करीत आहेत. तर ग्रामपंचायतीने सैन्य दलातून सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सत्कार करून त्यांच्या देशसेवेबद्दल गौरव करण्याचा पायंडा पडला आहे. ध्वजारोहण नंतर श्री संत नामदेव महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी सुनील देशमुख या होत्या. कार्यक्रमास सामजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, सेवा सोसायटीचे चेअरमन अरुण काळे, जेष्ठ नेते शिवाजी गायकवाड, जेष्ठ नागरिक बळीराम गलांडे, माजी सरपंच सुनील देशमुख, सुनील नखाते, नारायण नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गावातील माजी सैनिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह, पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.