अंबाजोगाई : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अंबाजोगाई पोलिसांनी उचललेले पावले आता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागले आहेत. अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या पुढाकारामुळे मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अलीकडेच अंबाजोगाईत जनसंवाद कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात शहरातील नागरीकांनी वाहतुकीशी संबंधित अडचणी मांडल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी दोन महिन्यांपासून दुकानासमोरील अतिक्रमण, अनधिकृत वाहनतळ आणि हातगाड्यांवर सूचना देण्याचे सत्र सुरू केले होते.
गुरुवारी (७ ऑगस्ट) शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस हवालदार वडकर आणि पोलीस अंमलदार चादर यांनी संयुक्त कारवाई करत सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही केली.
चंदनकुमार यादव, कुरेशी इमरान इब्राहीम, बालाजी भुजंगे, जुनेद शेख आणि जावेद बागवान या दुकानदारांनी रस्त्यावर दुकानाचे सामान, फळगाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. त्यांच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात देखील सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदार, हातगाडीवाले आणि वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहरात वाढत्या वाहतुकीचा भार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचा घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.