अंबाजोगाई : सासऱ्याच्या खूनप्रकरणी जावयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, हा महत्त्वपूर्ण निकाल अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करून आरोपीला दोषी ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
सहा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केला सखोल तपास; ॲड. लक्ष्मण फड यांचा न्यायालयात प्रभावी युक्तिवाद
ही घटना दोन वर्षापूर्वी केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) येथे घडली होती. मृत दत्तात्रय रामा गायके यांची मुलगी रेखा हिचा विवाह रामेश्वर बळीराम गोरे (रा. हिंगणगाव कोथाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्न होऊन आठ वर्षांनंतरही दोघांना अपत्य नव्हते. त्यामुळे रामेश्वरने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी रेखावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिच्या वडिलांनी परवानगी द्यावी, असा तगादा तो लावत होता. या कारणावरून तो रेखाला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास देत होता.
दरम्यान, मयत दत्तात्रय यांचा मुलगा मल्हारी याचे लग्न ११ जून २०२३ रोजी निश्चित झाले होते. यामुळे आरोपी रामेश्वरच्या मनात राग दाटून गेला होता. दि. ७ जून २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो केंद्रेवाडी येथे आला. यावेळी दत्तात्रय हे शेतातील आखाड्यावर झोपले होते. आरोपीने त्यांच्याबद्दल चौकशी केल्यानंतर रात्रीच्या अंधारात आखाड्यावर गाठले आणि धारदार शस्त्राने तब्बल २७ वार करून त्यांचा निर्घृण खून केला.
या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आली. कुमावत यांनी घटनास्थळाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले.
सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये शेजारील शेतकरी बंडू गिरी, लक्ष्मण केंद्रे व तपास अधिकारी पंकज कुमावत यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. ॲड. लक्ष्मण फड यांनी पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांच्या युक्तिवादास मा. न्यायालयाने मान्यता देत आरोपी रामेश्वर गोरे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात ॲड. अनंत तिडके यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले.