शिरूर कासार : वंजारवाडी येथील केवळ १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणी खोकरमोह येथील ओम आघाव युवकावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब नवनाथ मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी ही कारवाई केली. मिसाळ हे सध्या ग्रा.पं. वंजारवाडी व येवलवाडी येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 जुलै रोजी जिल्हा व बाल संरक्षण अधिकारी, बीड यांच्याकडून व्हॉट्सअॅपद्वारे एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये वंजारवाडी येथील तृप्ती रामा खाडे या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह खोकरमोह येथील युवकासोबत झाल्याची माहिती देण्यात आली होती.
या अनुषंगाने मिसाळ यांनी तातडीने संबंधित मुलीच्या घरी भेट दिली असता, तिच्या वडिलांनी विवाह झाल्याचे नाकारले. मात्र, दिनांक 31 जुलै रोजी जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडून पुन्हा एक पत्र प्राप्त झाले, ज्यामध्ये मुलगी व त्या युवकाच्या विवाहाचे फोटो मिळाल्याचे नमूद होते. पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपी ओम आघाव याने अल्पवयीन मुलीला वंजारवाडी येथून अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्याशी विवाह केला.
त्याआधारे प्राथमिक चौकशी केल्यानंतर व फोटोचा पुरावा पाहता सदर मुलीचा बालविवाह झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मिसाळ यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात त्या युवकावर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 9, 10 व 11 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात विवाहास सहकार्य करणाऱ्या इतर व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे.