बीड : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड यांनी पुणे शहरातून एक महत्त्वाची कारवाई करत पीडितेची सुटका केली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव आणि त्यांच्या टीमने केली.
शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ७१/२०२१, भारतीय दंड विधान कलम ३६३ आणि ३७० अन्वये नोंदविण्यात आलेला होता. सदर प्रकरणाचा तपास AHTU कडे सोपविण्यात आला होता. पीएसआय पल्लवी जाधव यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मूळ फाईलचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी पीडित मुलीच्या मामा कडून तपशीलवार माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी आणि पीडितेचे लोकेशन पुणे शहरात असल्याचे निष्पन्न केले.
२ ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार AHTU ची टीम पुण्याला रवाना झाली. दोन दिवसांपर्यंत आरोपीचे ठिकाण सतत बदलत असल्याने शोधमोहीम कठीण झाली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर वाघोली येथील अव्हाळवाडी रोडवरील YMK सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आरोपीचा शोध लागला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पीडिता गणेशनगर, वाघोली येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पीडितेकडे जाऊन तिची सुटका करण्यात आली. दोघांना ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पीएसआय पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई प्रदीप वीर आणि योगेश निर्धार यांनी संयुक्तरित्या पार पाडली.