अंबाजोगाई : प्रॉपर्टी व्यवहारातून भागीदारांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे अंबाजोगाईतील व्यवसायिकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत व्यक्तीच्या पत्नीने केला. या प्रकरणी त्यांच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पाच जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे.
फातेमा शेख (वय ४०, रा. गांधीनगर, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी पती जावेद अली शेख यांचा मृत्यू सहव्यावसायिकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. जावेद अली यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. २८ जुलै २०२३ रोजी त्यांनी हमीद मुस्तफा खान (रा. रिसोड, जि. वाशिम) यांच्याकडून २० एकर १९ गुंठे जमीन सुमारे २४ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारात अंबाजोगाईतील जलील नियाजोद्दिन शेख, शोएब आयुब कुरेशी, जिलानी बशीर कुरेशी, अनुप ललितमोहन जाजु, कुलदीप किशोर परदेशी, ईजाज फतरू अली आणि फेरोज अब्दुल सत्तार हे सहभागी होते. या सर्वांनी मिळून ६ कोटी २७ लाख रुपये इसार म्हणून दिले होते. या जमिनीचे एन.ए. (नॉन-अॅग्रिकल्चरल) रूपांतर दोन महिन्यांत होणार होते.
मात्र, वेळेत रूपांतर न झाल्यामुळे व्यवसायात अडथळे निर्माण झाले आणि भागीदारांमध्ये वाद सुरू झाले. या पार्श्वभूमीवर शोएब कुरेशी व अनुप जाजू हे जावेद यांना वारंवार फोन करून धमकी देत होते, असे फातेमा शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे जावेद अली यांनी माजेद इनामदार यांची घेतलेली अंदाजे ३ कोटी रुपयांची जमीन शोएब कुरेशी आणि अनुप जाजू यांच्याकडे तारण म्हणून ४ जानेवारी २०२५ रोजी नोटरी करून दिली होती.
त्यानंतर रविवारी (दि.३ ऑगस्ट) रात्री १० वाजता राजीव गांधी चौकातील सुदर्शन धोत्रे यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी संदर्भात बैठक झाली. बैठकीला जावेद शेख यांच्यासह शोएब कुरेशी, अनुप जाजु, दिनेश भराडिया, सचिन जाधव, सुदर्शन धोत्रे व वसीम कुरेशी उपस्थित होते. या बैठकीत जावेद यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत तारण ठेवलेल्या मालमत्तेची नोंदणी करण्याचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला.
या वादात जावेद यांना तीव्र तणाव आणि घाम आला. त्यांनी छातीत कळ येत असल्याचे सांगून रुग्णालयात जायची विनंती केली, मात्र त्यांना थांबवण्यात आले. अखेर वसीम कुरेशी यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर फिर्यादीवरून शोएब कुरेशी, अनुप जाजू, दिनेश भराडिया, सचिन जाधव आणि सुदर्शन धोत्रे या पाच जणांवर बीएनएस कलम १०५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत.