(कृषी खात्याची जबाबदारी अखेर दत्तात्रय भरणेंकडे) बीड : राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा राजकीय उलथापालथ होत गुरुवारी (३१ जुलै) रात्री उशिरा कृषी खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली. तर वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
या खात्याची जबाबदारी पुन्हा एकदा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन दिवस त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेटही घेतली. मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली आणि भरणे यांची निवड करण्यात आली.
यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. कारण मुंडे यांना क्लिन चिट मिळालेल्या प्रकरणात धस यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी १६९ कोटींच्या नव्या घोटाळ्याचे आरोपही लावले. याच दिवशी त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट पत्रकार परिषद घेऊन मुंडेंवर गंभीर आरोप केले.
धनंजय मुंडे यांच्यावर आधीपासूनच वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर ताण निर्माण झाला होता. कराड हे संतोष देशमुख यांच्या खुनात सहभागी असल्याचे विशेष मकोका न्यायालयाने स्पष्ट केले होते. मुंडे यांचे त्यांच्याशी निकटचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचा राजीनामा घेतला गेला होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मुंडेंच्या विरोधात आघाडी घेतली. त्यामुळेच अखेर धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची शक्यता थांबली आणि कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आली.
राजकीय वर्तुळात आता हे स्पष्ट झाले आहे की, बीड जिल्ह्यातील राजकारणात अजूनही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता कायम आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रभाव असला तरी त्यांच्यावरील आरोप आणि विरोधकांची आक्रमक भूमिका यामुळे त्यांचा पुढील राजकीय प्रवास काहीसा खडतर ठरण्याची चिन्हं आहेत.