कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना बहुप्रतिक्षित दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला असून, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) येत्या १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरात कार्यान्वित होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) अधिकृत अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली.
या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, न्यायप्रक्रियेसाठी मुंबईला जाण्याची वेळ आता नागरिकांवर येणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होणार असून, न्याय अधिक जवळचा आणि सुलभ होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी ही मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती. सामान्य नागरिकांपासून वकिलांपर्यंत अनेकांनी आंदोलने केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, विविध सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी यासाठी ठाम पाठपुरावा केला होता. ‘पुढारी’सारख्या माध्यमांनी सातत्याने हा मुद्दा मांडत जनतेचा आवाज अधोरेखित केला.
मुंबईला जाऊन न्यायासाठी झगडणाऱ्या नागरिकांचा आजचा दिवस विजयाचा आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरचा न्यायनगरीकडे वाटचाल अधिक वेगाने होणार असून, न्यायाच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.