अंबाजोगाई : अंबाजोगाई तहसील कार्यालयात इनरव्हिल क्लबच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मंगळवारी उत्साहात पार पडले. या उपक्रमाला प्रशासकीय व सामाजिक स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद लाभला.
हिरकणी कक्षाचे उद्घाटन तहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी निवासी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. राजेश इंगोले तसेच जयसिंह घात या मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी तहसीलदार तरंगे यांनी हिरकणी कक्षाच्या संकल्पनेचे व इनरव्हिल क्लबच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात अशा उपक्रमांची तहसील कार्यालयात नितांत गरज असल्याचे सांगून क्लबला शुभेच्छा दिल्या. डॉ. इंगोले यांनीही क्लबच्या सामाजिक भान असलेल्या उपक्रमांना पाठिंबा दर्शवित भविष्यकाळातही सहकार्याचे आश्वासन दिले. स्मिता बाहेती यांनी आपल्या मनोगतातून इनरव्हिल क्लबच्या कार्यशैलीचे कौतुक करत आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेखा सिरसट यांनी केले. या वेळी क्लबच्या चंद्रकला देशमुख, अंजली चरखा, सुरेखा कचरे, वर्षा देशमुख, वर्षा ठाकूर या सदस्यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.