नवी दिल्ली – भारतीय बाजारात लोकप्रिय ठरलेल्या येझदी मोटरसायकल्सने आपली रोडस्टर ही प्रसिद्ध बाइक नव्या रूपात सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. येझदी रोडस्टरची ही सुधारित आवृत्ती १२ ऑगस्ट रोजी लॉंच होणार असून, यामध्ये डिझाइनमध्ये बदल आणि इंजिनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन डिझाईन, सुधारित इंजिन आणि आकर्षक रंगसंगतीसह येणार नवी आवृत्ती
यापूर्वी येझदीच्या ॲडव्हेंचर मॉडेलमध्ये अशाच प्रकारचे अपडेट्स देण्यात आले होते. आता रोडस्टर आणि लवकरच स्क्रॅम्बलर मॉडेलही नव्या स्वरूपात बाजारात उतरवण्याची तयारी ब्रँडकडून सुरू आहे. चाचणी दरम्यान भारतीय रस्त्यांवर दिसलेल्या या नवीन रोडस्टरच्या चित्रांमधून बदल स्पष्ट दिसून आले आहेत.
डिझाइनमध्ये ठळक बदल
नवीन रोडस्टरमध्ये टर्न इंडिकेटर्स आणि टेल सेक्शनच्या डिझाईनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मागील फेंडर लहान करण्यात आल्यामुळे ही मोटरसायकल आता अधिक क्रूझर लूकमध्ये दिसते. पिलियन सीट देखील थोडीशी लहान करण्यात आली आहे. येझदीच्या पारंपरिक स्टाईलनुसार ड्युअल एक्झॉस्ट सिस्टम कायम ठेवण्यात आले आहे. यासोबतच नवे रंग पर्यायही देण्यात येणार आहेत, ज्यामुळे ही मोटरसायकल अधिक आकर्षक भासणार आहे.
इंजिन आणि कामगिरीत सुधारणा अपेक्षित
सध्या विक्री होणाऱ्या येझदी रोडस्टरमध्ये 334 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 29 बीएचपी आणि 29.4 एनएम टॉर्क निर्माण करतं. हे इंजिन सहा-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. नव्या मॉडेलमध्ये इंजिनच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता असून, त्यामुळे रायडिंग अनुभव अधिक गतीशील आणि आरामदायक होणार आहे.
सस्पेन्शनसाठी पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्सॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी 320 मिमी फ्रंट डिस्क व 240 मिमी रियर डिस्क ब्रेक्ससह फ्लोटिंग कॅलिपरचा समावेश आहे.
किंमत आणि बाजारातील स्पर्धा
सध्या उपलब्ध असलेल्या रोडस्टरची एक्स-शोरूम किंमत ₹2.10 लाख आहे. नव्या मॉडेलमध्ये झालेल्या बदलांमुळे किंमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही, डिझाइन व कामगिरीमधील सुधारणा लक्षात घेतल्यास ही बाइक मोटरसायकलप्रेमींसाठी नक्कीच आकर्षक ठरणार आहे.
येझदीनं ॲडव्हेंचर मॉडेलच्या यशानंतर रोडस्टर आणि स्क्रॅमब्लरच्या माध्यमातून रॉयल एनफील्डसारख्या ब्रँड्सला थेट टक्कर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या नव्या रोडस्टरच्या लॉंचकडं सर्वच बाईकप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.