कार्यालया समोरच्या वीज खांबालाच वेलींचे वेटोळे
अंबाजोगाई : पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या आवश्यक देखभाल कामांकडे महावितरणकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या शहर, ग्रामीण आणि विभागीय कार्यालयाच्या समोरच वीज खांबांवर वेली वाढून वीज तारांभोवती वेटोळे घालत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून झाडांच्या फांद्या कापणे, वीज खांबांवरील वेली काढणे, गंजलेले किंवा वाकलेले खांब दुरुस्त करणे अशी मानसूनपूर्व कामे केली जातात. मात्र यंदा ही कामे केवळ कागदावरच झाल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या खांबांवर हिरव्या वेली वाढल्या असून त्या थेट डीपी आणि वीजतारांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ येत आहे. शहरातच जर अशी स्थिती असेल, तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करता येते, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातही गंभीर स्थिती
ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वीज खांबांवर झाडांच्या फांद्या आणि वेली वाढलेल्या असून, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. लाईनमन गावात फिरकत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.
डीपी बॉक्स उघडे, लहान मुलांचा जीव धोक्यात
शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातीलही अनेक डीपी बॉक्स सताड उघडे आहेत. अनेक ठिकाणी डीपीला दरवाजेच नसून, फ्युजऐवजी सरळ तारा जोडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मुलांना त्या डीपीला हात लावण्याचा धोका आहे. याकडे महावितरणने साफ दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांची मागणी
महावितरणने तातडीने कारवाई करून शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व वीज खांब, डीपी व झाडांच्या फांद्यांची तपासणी करून आवश्यक ती देखभाल करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.