बीड शहरातील जुनी भाजीमंडई परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सोहेल खान समद खान (वय 27) या धोकादायक गुंडावर अखेर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी हर्सुल (छत्रपती संभाजीनगर) कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही महत्त्वपूर्ण कारवाई पार पडली. बीड शहरातील सुभाष रोड, बशीरगंज, बलभीम चौक, कारंजा व राजुरीवेश या भागात दादागिरी करणाऱ्या सोहेल खानविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, धमकी, शिवीगाळ आदी स्वरूपाचे एकूण ७ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी ५ गुन्हे न्यायप्रविष्ट असून २ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
या गुंडावर यापूर्वी BNSS कलम 129 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र कारवाईस न जुमानता त्याने पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याने नागरिक भयभीत होते व तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिनांक 26 जुलै 2025 रोजी एमपीडीए अंतर्गत आदेश काढून त्याला तात्काळ अटक करून हर्सुल कारागृहात रवाना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांच्या पथकाने त्याला बीड शहरातून ताब्यात घेतले. त्यानंतर 27 जुलै रोजी पहाटे 2.30 वाजता हर्सुल कारागृहात पोहोचवण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोनि. शितलकुमार बल्लाळ, सपोनि बाबा राठोड, पोह. सचिन अलगट, महादेव दराडे, गणपती राऊत (पो.स्टे. बीड शहर) तसेच स्था.गु.शा. बीडचे पोउपनि. सिद्धेश्वर मुरकुटे, अभिमन्यु औताडे, पोना. अंकुश वरपे, युनूस बागवान, अश्फाक सय्यद, मनोज परजणे, बिबिसेन चव्हाण यांनी सहभाग घेतला.
पुढील काळातही अशा धोकादायक गुंड, वाळू माफिया, मटका-जुगार चालक व खंडणीबहाद्दर गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिला आहे.