बीड : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर परिसरात जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोड्यांचा पर्दाफाश केला आहे.
पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांनी घरफोड्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरू असलेल्या तपासादरम्यान दिनांक २६ जुलै रोजी पथकाला गोपनीय माहितीनुसार समजले की बर्दापुर परिसरात घरफोड्या करणारे आरोपी सध्या बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात थांबलेले आहेत.
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत झडप घालून दोन संशयितांना अटक केली. त्यांची नावे शेख ईरफान मुनीर (२१, रा. पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि मुस्तफा कासिम पठाण (२७, रा. पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी आहेत.
तपासादरम्यान आरोपींनी जानेवारी महिन्यात बर्दापुर पोलीस ठाणे हद्दीतील गिरवरी, जवळगाव आणि बर्दापुर या तीन ठिकाणी बंद घरे फोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही गंभीर आहे.
या आरोपींवर यापूर्वी विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे तीन गुन्हे, नांदेड ग्रामीण येथे एक, रेणापूर येथे एक आणि परळी ग्रामीण येथे एक असे गंभीर स्वरूपाचे चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी बर्दापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रभारी अधिकारी सपोनि ससाणे तपास करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सिध्देश्वर मुरकुटे, पो.ह. विकास राठोड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, पो.अं. आशपाक सय्यद, मनोज परजणे, नारायण कोरडे व स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पथकाने केली.
पोलीस दलाच्या या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.