बीड – नाम फाउंडेशन मार्फत मोफत मशीन आणि मोफत डिझेल देऊन येथील जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील नदीमध्ये खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने ही नदी खचाखच भरली असून परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी नामचे कौतुक केले आहे. आज जनआंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी या साठलेल्या पाण्याची पाहणी केली.
नामच्या मोफत कामाचे कौतुक
सलग तीन किलोमीटर पाणी साठणार असल्याने आता या गावातील शेतकऱ्यांना फार मोठी ऊर्जा मिळाली आहे. शेतकऱ्यांना दोन पिके बिनधास्त घेता येतील आणि प्रत्येक वर्षी या पाण्याचा फायदा घेता येईल. दोन दिवसात झालेल्या पावसाने अनेकांच्या विहिरीत पाणी आले असून अनेकांची बंद पडलेले पाण्याचे बोअर देखील चालू झाले आहेत, असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
नदीत साठलेले पाणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून एक वेगळा आनंद परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यामुळे नाम फाउंडेशनच्या कामाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
या गावातून जाणारी नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम गेल्या दीड महिन्यापूर्वी नामने हाती घेतले होते. आणखी काही दिवस काम चालले असते. परंतु दररोज पडत असलेल्या पावसामुळे मशीन चांगल्या पद्धतीने काम करू शकत नव्हती. त्यामुळे आणि ठरल्याप्रमाणे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे नामच्या कामाला यश आले आहे. या कामावर ॲड. अजित देशमुख यांनी सातत्याने लक्ष दिले. आणि काम चांगले व्हावे यासाठी प्रयत्न केले.
पाणी अडवण्यासाठी नदीचे रुंदीकरण शक्य तेवढे मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून खोलीकरणात देखील काही ठिकाणी पंधरा फूट पाणी साठले आहे. आणखी पाणी साठण्याची मोठी क्षमता त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. या पाहणीच्या वेळी भागवत कदम, तुषार देशमुख, मंगेश देशमुख, मोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.