अंबाजोगाई : घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून सतत मारहाण व मानसिक छळ केल्यामुळे, अंबाजोगाईतील २० वर्षीय विवाहिता अनम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाईतील घटना, पतीसह तिघांवर गुन्हा
अनमचा भाऊ मुजफ्फर सिकंदर शेख यांच्या फिर्यादीनुसार, अनम शेख हिचा विवाह २०२३ मध्ये गांधीनगर येथील सोहेल अफसर शेख याच्याशी झाला. विवाहावेळी मानपान, संसारोपयोगी वस्तू, व अंगावर सोन्याचे दागिने देण्यात आले होते. सध्या तिला पाच महिन्यांचा एक मुलगाही आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच पती सोहेल शेख याला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर त्याने व त्याच्या घरच्यांनी अनम हिचे दागिने मोडून घरखर्चासाठी वापरले. दागिने संपल्यावर माहेरून पैसे आणावेत म्हणून अनमवर सतत मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. तिचे पती सोहेल, दिर मझहर शेख आणि जाऊ तन्नो शेख यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अनमच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करत काही वेळा पतीला पैसेही दिले. मात्र तरीही छळ सुरूच राहिला. २६ जुलै रोजी सोहेल शेख याने तिच्या आईकडे ३०,००० रुपये वेल्डिंगच्या दुकानासाठी मागितले. पैसे न मिळाल्यामुळे तो संतप्त झाला होता.
त्यानंतर २७ जुलैच्या मध्यरात्री अनमच्या सासऱ्यांनी फोन करून सांगितले की अनमने विषारी औषध घेतले आहे. मात्र जेव्हा कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सदर फिर्यादीवरून पती सोहेल शेख, दिर मझहर शेख व जाऊ तन्नो शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतले असून पुढील तपास पीएसआय रवीकुमार पवार करत आहेत.