अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाईच्या भूमिपुत्र इशान राहुल हाके पाटील याने नुकत्याच पार पडलेल्या १२ वीच्या NEET-UG परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवत लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमधून तिसरा क्रमांक मिळवला आहे. इशानच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.
इशान हाके पाटील हा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राहुल हाके पाटील आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रुपाली हाके पाटील यांचा पुत्र आहे. इशान याने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथील सर्निजी इंग्लिश स्कूलमध्ये घेतले असून, बाल्यावस्थेपासूनच तो आपल्या वर्गात नेहमी टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवत आला आहे.
दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी इशान याने लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथेही त्याने सतत टॉप फाईव्हमध्ये स्थान कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी NEET-UG परीक्षेत त्याने ९९.२० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे.
या यशानंतर लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत इशानचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
इशानच्या या यशामागे गेल्या दोन वर्षांपासून त्याचे पालक डॉ. राहुल व डॉ. रुपाली हाके पाटील यांचे मार्गदर्शन व पाठबळ, तसेच कॉलेजमधील शिक्षकवृंदांचे परिश्रम मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. इशानच्या यशाबद्दल अंबाजोगाईतील शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.