बीड : ऐन खरीपाच्या तोंडावरबीड जिल्ह्यात डीएपी खत व सोयाबीन, कपाशीच्या बियाणांची शेतकऱ्या कडून मागणी वाढताच खात व बियाणे बाजारातून गायब झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
ऐन पेरणी हंगामात शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी म्हंटले आहे.
एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध असल्याचे सांगतात, मग मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना ते शेतकऱ्यांना का मिळत नाही ? बीड जिल्ह्यात खरीप पेरणी जवळ आली असतानाच डीएपी खताची आवक कमी झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना डीएपी खतासोबत व कपाशीच्या काही नामांकित बियाणेवर इतर गरज नसलेल्या खताची व बियाणे ची लिंकिंग केल्या जात आहे.
यामुळे आधीच नापिकी आणि अवकाळी ने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या बाबतीत शासनाचा कृषी विभाग अजूनही झोपेत असून कृषी विभागाचे भरारी पथक काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी विभागाच्या साह्याने काही कृषी सेवा केंद्र कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे होऊ देणार नसुन, कृषी विभागाने यावर तात्काळ कागदी घोडे न नाचवता उपाययोजना करावी व शेतकऱ्यांची लिंकिंग द्वारे होणारी लूट थांबवावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी दिला आहे.