Breaking
Updated: July 12, 2025
WhatsApp Group
Join Nowराजकिशोर मोदी व राजेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने १५ ते २२ जुलै दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना अजितदादा पवार तसेच राज्याचे माजी कृषीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने अंबाजोगाई शहरात १५ जुलै ते २२ जुलै २०२५ या कालावधीत सेवा सप्ताहाचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. हा सेवा सप्ताह राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येणार असून “सात दिवस सात उपक्रम” या संकल्पनेवर आधारित सामाजिक कार्यक्रमांची मालिका राबवण्यात येणार आहे. राजकिशोर मोदी व राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सप्ताहात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण व जनजागृती यांसारख्या विविध विषयावर आधारित हे समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणाऱ्या या उपक्रमांमुळे अंबाजोगाईमध्ये सेवाभावाची सकारात्मक अशी लाट निर्माण होणार आहे. रक्तदान शिबिराने सेवा सप्ताहाचा शुभारंभ
मंगळवार १५ जुलै रोजी युवा वर्गामध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच गरजूं रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून या सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे . या रक्तदान शिबिरात अनेक तरुण स्वयंसेवक सहभाग नोंदवणार आहेत. बुधवार दि १६ रोजी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार असून यात सार्वजनिक जागांमध्ये व शासकीय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत.
गुरुवार दि १७ रोजी अंबाजोगाई बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. शहराच्या स्वच्छता व सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मोदी व चव्हाण यांनी केले आहे. शुक्रवार दि १८ जुलै रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शहरातील शाळा व संस्थांशी समन्वय साधून तेथील विद्यार्थ्यांना सदर शैक्षणिक मदत पोहोचवली जाणार आहे. शनिवार दि १९ जुलै रोजी प्लास्टिकमुक्त अंबाजोगाईसाठी जनजागृती मोहिम राबवण्यात येणार आहे. याद्वारे पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे संदेश या माध्यमातून समस्त नागरिकांस दिले जाणार आहे. दि २० रोजी श्री योगेश्वरी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत महाप्रसादद्वारे अन्नदान करण्यात येणार आहे. सोमवार दि २२ जुलै रोजी “तुमचं मत, माझं कर्तव्य” ही नाविन्यपूर्ण अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेतून नागरिकांच्या गरजा, त्यांच्या तक्रारी व नागरिकांच्या प्रलंबित मागण्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी एक विशेष जनसंपर्क उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा आणि त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जाणार आहे.
या संपूर्ण सप्ताहात राजकिशोर मोदी (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) तसेच ऍड राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा का पार्टी ) यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह या अंतर्गत विविध विधायक उपक्रम यशस्वीपणे संपन्न होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात यापूर्वीही अनेक विविध सामाजिक , सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम यशस्वी पणे राबवण्यात आले असून याद्वारे शहर व परिसरात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या सेवा सप्ताहाचे उद्दिष्ट केवळ कार्यक्रम राबवणे नसून येथील युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, नागरिकांच्या गरजा समजून घेणे आणि पर्यावरणपुरक स्वच्छ, शिक्षित आणि आरोग्यदायी समाजनिर्मितीकडे वाटचाल करणे हे आहे. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहर व परिसरात लोकसहभागातून परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होण्यास प्रेरणा मिळणार आहे.