राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. राज्यात बहुतांश भागात ७ ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची आणि राज्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ जुलैपर्यंत विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात (१८ ते २४ जुलै) विदर्भाचा काही भाग सोडला तर राज्यातील इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या आठवड्यात (२५ ते ३१ जुलै) विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात (१ ते ७ ऑगस्ट) दक्षिण मराठवाडा वगळता राज्याच्या इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहील. त्यानंतर या भागात पावसाचा जोर ओसरेल. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुरतगड, सिकर, ग्वालियर, दौलतगंज,कोन्ताई ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत आहे.
तसेच हरियाणा आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरावरही वारे वाहत आहेत. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, आणि गोंदिया तर मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसर आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या सरींची शक्यता आहे. कोकणातही रविवार ते सोमवार या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारनंतर पुढचे दोन – तीन दिवस विदर्भात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. खानदेशात या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा जोर राहील. मराठवाड्यात मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.