Breaking
Updated: July 12, 2025
WhatsApp Group
Join Nowपरळी – रेल्वेत नोकरी लावतो म्हणून परळी वैजनाथ येथील महादेव भरत मुंडे (वय २१) या युवकाची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संभाजीनगर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, महादेव मुंडे यांचे शिक्षण सुरू असून ते कुटुंबासमवेत पंचशीलनगर, परळी येथे राहतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या वडिलांचे ओळखीचे असलेले काशीनाथ भानुदास घुगे रा. शिवाजीनगर,परळी यांनी त्याला रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून विश्वासात घेतले.
५ डिसेंबर २०२३ रोजी ते महादेवला दिल्लीला घेऊन गेले व तेथे त्याचे मेडिकल करण्यात आले.यानंतर, सचिन नारायण वंजारे रा. परळी यांच्या खात्यावर दोन दिवसात एकूण १ लाख रुपये पाठविण्यात आले. त्याच्या मोबदल्यात महादेवला रेल्वेच्या गेटमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले गेले. पुढे अमृतसर येथे जाऊन ट्रेनिंगची प्रक्रिया सुरू झाली. परंतु नंतर, रेल्वे कॉर्टर मिळवण्यासाठी आणखी ३ लाख रुपये मागण्यात आले. महादेवच्या वडिलांनी आपल्या खात्यातून ९० हजार रुपये काशीनाथ यांना पाठवले. अमृतसर येथे सुरजसिंह नावाच्या इसमाशी संपर्क करून गेट क्र.२६ वर ट्रेनिंग सुरू झाली.
पुढील टप्प्यात महादेवकडून संजय ठाकूर, मनिष यादव, एस. के.सिंग या व्यक्तींनी वेळोवेळी संपर्क करून ५० हजार ते ६ लाखांपर्यंतची रक्कम मागून घेतली. या शिवाय, महादेवच्या मामाकडून आणि आजोबांकडून त्याच्या चुलत मामासाठी ” टी सी” या पदावर नोकरी लावण्यासाठी तब्बल १४,७०,००० रुपये उकळण्यात आले. यातून काही रक्कम स्वतः महादेवच्या खात्यातून व वडिलांच्या खात्यातून प्रेमकुमार यांच्या खात्यावर पाठवली.
अशी तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून काशीनाथ घुगे, सचिन वंजारे (रा.परळी वैजनाथ),संजय ठाकूर (रा.दिल्ली), सुरजकुमार सिंग (अमृतसर, पंजाब), या चार जणांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हे करीत आहेत.