Breaking
Updated: July 10, 2025
WhatsApp Group
Join Nowमाजलगाव – नगर परिषदेतील शासकीय काम मंजूर करण्याच्या मोबदल्यात तब्बल 12 लाख रुपयांची लाच मागणारा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या राहत्या घरी रंगेहाथ पकडले. तडजोडीनंतर सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई गुरुवारी (दि. 10 जुलै) रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली.
मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने एका गुत्तेदाराकडे शासकीय फाईल मंजुरीसाठी 12 लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित गुत्तेदाराने ही माहिती थेट एसीबीकडे दिली. चौकशीदरम्यान तक्रारीची सत्यता पटल्याने छत्रपती संभाजीनगर एसीबीने सापळा रचून पिताजी नगरी, माजलगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी कारवाई केली.
यावेळी मुख्याधिकारी चव्हाण याने सहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. एसीबीचे अधिक्षक केशव दिंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या कारवाईची माहिती मिळताच बीड एसीबीचे दोन स्वतंत्र पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरझडतीची कार्यवाही सुरू केली असून, उशिरापर्यंत झडती सुरू होती. यावेळी घरातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांबाबत पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्याधिकारी चव्हाण याच्या अटकेमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.