Breaking
Updated: July 10, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बीड : मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बीडने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांच्या आदेशानुसार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने कार्यवाही केली.
दिनांक 9 जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मांजरसुंबा येथे शिकर इंग्लिश स्कूल परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत बाभळखुटा (ता.बीड) येथील गोकुळदास मगर बोरगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने बीड, सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरातून एकूण सहा मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.
या आरोपीकडून एकूण सहा मोटारसायकली, अंदाजे किंमत 1.50 लाख रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2024 मध्येही मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याकडून 22 मोटारसायकली जप्त करत 18 गुन्हे उघडकीस आणले होते.
सदर कारवाईत पोह. महेश जोगदंड, पोह. जफर पठाण, पोह. दीपक खांडेकर, पोअं. बाप्पासाहेब घोडके, चापोह. गणेश मराडे यांनी सहभाग घेतला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.