Breaking
Updated: July 10, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विवाहिता आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, इतर चार आरोपींनाही न्यायालयाने जामीन दिला आहे.
कि.फौ.अ.क्र. 278/2025, संदीप विरुद्ध सरकार या प्रकरणात फिर्यादीने पोलीस ठाणे बर्दापूर येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या बहिणीचा विवाह दि. 22 मे 2022 रोजी संतोष विलास शिंदे (रा. गीता, ता. अंबाजोगाई) याच्याशी झाला होता. संतोष शिंदे आणि त्याचा मित्र संदीप काचगुंडे यांच्यात भागीदारीत अंबाजोगाई आणि धारूर येथे चष्म्याची दुकाने आहेत. सुरुवातीला वर्षभर फिर्यादीच्या बहिणीला सासरी चांगले नांदवले, मात्र त्यानंतर सासरचे लोक सासरे विलास व्यंकट शिंदे, सासू सुमन विलास शिंदे, नणंद सीमा विलास शिंदे तसेच पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांनी एकत्र येऊन तिच्याकडून ऑप्टिकलचे तिसरे दुकान टाकण्यासाठी पैसे मागणे, मारहाण व शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
या छळास कंटाळून पीडितेने दि. 5 जून 2025 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 च्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर फिर्यादीवरून कलम 108, 85, 115(2), 352, 3(5) भा.दं.सं. (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिस अटकेची भीती असल्यामुळे आरोपी संदीप काचगुंडे याने ॲड. आर. एम. धायगुडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
मा. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 27 जून 2025 रोजी संदीप काचगुंडे याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
त्यानंतर या प्रकरणातील सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे व व्यंकट शिंदे या आरोपींनीही ॲड. आर. एम. धायगुडे यांच्यामार्फत जामीन अर्ज क्र. 285/2025 दाखल केला होता. न्यायालयाने दि. 08 जुलै 2025 रोजी त्यांनाही जामीन मंजूर केला.
या सर्व आरोपींच्या वतीने ॲड. आर. एम. धायगुडे यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांना ॲड. जी. डी. कांदे, ॲड. डी. ए. लोंढाळ, ॲड. अविनाश धायगुडे, ॲड. ओ. ए. लोंढाळ, ॲड. दयानंद गडदे व ॲड. पी. पी. धायगुडे यांनी सहाय्य केले.