Breaking
WhatsApp Group
Join Nowबीड : स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) बीड यांच्या संयुक्त पथकाने शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील तक्षशिला नगर परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा टाकत दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत दोन महिला एजंट्सना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३ जुलै २०२५ रोजी AHTU कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्षशिला नगर, धानोरा रोड येथील भगवान विद्यालयाच्या मागील बाजूस काही महिला परराज्यातून महिला बोलावून वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला.
डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे १५०० रुपये देताच आशा पंडित गायकवाड (वय ४५, रा. सुभाष रोड, बीड) या महिला एजंटने वेश्याव्यवसायासाठी सहमती दर्शवली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या तीन नोटा पंचासमक्ष हस्तगत केल्या. यावेळी घटनास्थळी दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याशी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत, आरोपी आशा गायकवाड व तिची सहकारी कुशीवर्ता मोहन शिराळे (रा. धानोरा रोड, बीड) या दोघींनी महिलांना आर्थिक लाभासाठी बोलावून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याची कबुली पीडित महिलांनी दिली.
पोलिसांनी रुमची झडती घेतली असता USTAD कंपनीचे १२ वापरात न आणलेले निरोध आढळून आले. आरोपींनी स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून पीडित महिलांचे शोषण केले असल्याने त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि मुरकुटे, पोह/१६२६ शिंदे, पोशि/२२१० अशपाक, पोशि/२२१५ परझणे (स्थानीक गुन्हे शाखा बीड), तसेच पोउपनि पल्लवी जाधव, मपोह/९९७ उषा चौरे, मपोह/६८ शोभा जाधव, मसफौ/८४२ मिरा रेडेकर, पोह/२१५७ प्रदीप येवले, पोह/२४२ अशोक शिंदे आणि पोशि/१९८२ योगेश निर्धार (AHTU बीड) यांच्या पथकाने केली.
Last Updated: July 4, 2025