जिल्ह्यात १८ जुलैपासून कृत्रिम साहित्याचे वाटप, पंचायत समिती स्तरावर शिबीरांचे आयोजन

बीड: दिव्यांग बांधवांना सहानुभूती नव्हे, तर भक्कम साथ देऊया!, या उदात्त दृष्टीकोनातून खा.बजरंग सोनवणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण बीड लोकसभा मतदार संघामध्ये दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य/साधने वाटप करण्यात येणार आहे. दि.१८ जुलैपासून हे शिबीर पंचायत समिती स्तरावर राबविण्यात येत आहे.बीड लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये भव्य पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव, विविध सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’ अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणे प्रदान करणे हा आहे. एलिम्को, मुंबई या केंद्र शासनाच्या अधिकृत संस्थेच्या माध्यमातून, १८ जुलै ते ३० जुलै २०२५ या कालावधीत बीड लोकसभा मतदार संघात ही विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यकतेनुसार तात्काळ मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप केले जाईल. हा उपक्रम दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर होण्यास आणि दैनंदिन जीवन सुलभ करण्यास मदत मिळेल.०००बीड लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत गावचे प्रमूख म्हणून सरपंच आणि गावातील तरूणांनी ही माहिती द्यावी, जेणे करून त्यांना या शिबीराचा लाभ होईल.-खा.बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदारसंघ