Breaking

शिष्यवृत्ती परीक्षेत आष्टीचा ‘वसुंधरा पॅटर्न’ राज्यात अव्वल; ९ वर्षांत ९९३ गुणवंतांनी मारली बाजी

Updated: जानेवारी 19, 2026

By Vivek Sindhu

९ वर्षांत ९९३ गुणवंतांनी मारली बाजी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात, मात्र बीड जिल्ह्यातील आष्टी येथील वसुंधरा प्राथमिक विद्यालयाने या परीक्षेत आपला एक वेगळा आणि आश्वासक ठसा उमटवला आहे. मागील नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या शाळेतील तब्बल ९९३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, ६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणाऱ्या या राज्यस्तरीय परीक्षेत बीडच्या या एकाच शाळेचे विद्यार्थी सातत्याने गुणवत्ता यादीत येत असल्याने संपूर्ण राज्यात ‘वसुंधरा पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे.

वसुंधरा विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेचा जो सातत्यपूर्ण प्रवास सुरू ठेवला आहे, त्याचे आकडे थक्क करणारे आहेत. आतापर्यंत या शाळेतील इयत्ता पाचवीचे ५९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून, त्यातील ७७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. इयत्ता आठवीचे ४०० विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यापैकी ६५ विद्यार्थी राज्य स्तरावर चमकले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी इयत्ता आठवीच्या तीन विद्यार्थ्यांनी चक्क राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता. सध्या या शाळेत ८०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेची ‘त्रिसूत्री’ आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध परिश्रम कारणीभूत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तब्बल १२ ते १४ महिने आधीपासूनच करून घेतली जाते. केवळ नियमित अभ्यासावर अवलंबून न राहता, दररोज सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ४:१५ ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांच्या जादा तासिका घेतल्या जातात. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून १५० ते २०० सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. या सराव परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावत असल्याचे दिसून येते.

यावर्षी देखील शाळेतील सुमारे २०० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सज्ज झाले असून सध्या त्यांचा युद्धपातळीवर सराव सुरू आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा बोंडार्डे यांनी सांगितले की, २०१६ पासून शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेची ही विशेष तयारी सुरू केली आहे. केवळ शाळेचे प्रयत्नच नव्हे, तर पालकांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच हा ‘वसुंधरा पॅटर्न’ राज्यात यशस्वी ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.


Categories

Recent Posts