Breaking
Updated: डिसेंबर 17, 2025
८ वर्षीय दिव्यांग स्वरा चाटेला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रॉन्झ पदक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel८ वर्षीय दिव्यांग स्वरा चाटेला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रॉन्झ पदक
मालवण/अंबाजोगाई: “जिद्द असेल तर अपंगत्व कधीच आड येत नाही,” हे अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अवघ्या आठ वर्षांच्या स्वरा चाटे हिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एका पायाचा पंजा नसतानाही या चिमुकलीने अथांग समुद्राच्या लाटांवर स्वार होत खुल्या स्पर्धेतील धडधाकट स्पर्धकांना मागे सारत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. मालवण येथे पार पडलेल्या १५ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्वरा हिने १ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत नेत्रदीपक कामगिरी करत ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सिंधुदुर्ग जलतरण संघटना आणि महाराष्ट्र जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मालवण येथे १३ व १४ डिसेंबर रोजी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अशा कठीण स्पर्धेत वरवटी येथील स्वरा लक्ष्मीकांत चाटे या चिमुकलीने १ किलोमीटरच्या गटात सहभाग घेतला. स्वरा ही दिव्यांग असून तिच्या एका पायाचा पंजा नाही. पोहताना पायांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यातच समुद्रातील खोंच लाटा आणि पाण्याचा प्रचंड वेग अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे मोठे आव्हान होते. मात्र, शारीरिक व्यंगाचा बाऊ न करता स्वरा हिने कमालीची जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वास दाखवत ही स्पर्धा पूर्ण केली आणि तृतीय क्रमांक पटकावला.
ब्रह्मदेव केरबा चाटे यांची नात असलेल्या स्वराच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने आपली गुणवत्ता, जिद्द व आत्मविश्वास सिद्ध केला आहे. स्वराच्या यशामुळे बीड जिल्हा तसेच अंबाजोगाई तालुक्याचा नावलौकिक राज्यभर वाढला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वरवटीचे सरपंच सुधीर चाटे, ग्रामस्थ, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. भविष्यात स्वरा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव नक्कीच उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.