Breaking
Updated: मार्च 28, 2026
पैसे वसुलीसाठी मानसिक त्रास; हिवरा येथील २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelयूसुफवडगाव: तुझ्या भावाने घेतलेले पैसे दे, अन्यथा तो कुठे आहे ते सांग, असे म्हणत वारंवार मानसिक त्रास दिल्याने एका २४ वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यूसुफवडगाव पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्षय वैजिनाथ यादव (वय २४, रा. हिवरा खुर्द, ता. अंबाजोगाई) या तरुणाला आरोपींनी पैशांच्या कारणावरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. अक्षयचा भाऊ याने आरोपींकडून काही पैसे घेतले होते, याच पैशांच्या वसुलीसाठी आरोपी अमन कैलास परदेशी (रा. अंबाजोगाई) आणि राधेशाम नागनाथ नानवटे हे अक्षयच्या मागे लागले होते. आरोपींनी अक्षयला गाठून त्याचे गच्ची धरून चापटीने मारहाण केली होती आणि शिवीगाळ करत धमकावले होते.
भावाच्या पैशांसाठी होणारा हा जाच आणि सततचा मानसिक त्रास असह्य झाल्याने अक्षयने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रकरणी अक्षयचे वडील वैजिनाथ शिवाजी यादव (वय ५०) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमन परदेशी आणि राधेशाम नानवटे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेडगे करत आहेत.