Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: हत्येचा थरार पाहून कोर्टात कुटुंबीयांचा आक्रोश; २३ व्हिडिओ क्लिप्सनी उलगडली क्रूरता

Updated: डिसेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

२३ व्हिडिओ क्लिप्सनी उलगडली क्रूरता

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

छत्रपती संभाजीनगर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे हत्येपूर्वीच्या मारहाणीचे तब्बल २३ व्हिडिओ क्लिप्स पुराव्यादाखल सादर करण्यात आले. आपल्या पतीवर झालेली अमानुष मारहाण आणि हत्येचा तो भयानक घटनाक्रम पाहून उपस्थित पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना कोर्टातच रडू कोसळले. भावनांचा बांध फुटल्याने त्यांनी कोर्ट हॉलबाहेर धाव घेत एकच आक्रोश केला.

न्यायमूर्तींसमोर सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी लॅपटॉपवर हे पुरावे सादर केले. हे पाहून कोर्टातील वातावरण सुन्न झाले. आरोपी कराडच्या वकिलांनी आपला अशील घटनास्थळी नसून शेकडो किलोमीटर दूर होता, असा बचाव केला. मात्र, सरकारी वकिलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अव्हाडा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती आणि कंपनी बंद होऊ नये म्हणून सरपंचांनी मध्यस्ती केली होती. याच रागातून त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली, असे गिरासे यांनी स्पष्ट केले.

सीडीआर रिपोर्ट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि न्यायवैद्यक अहवालाच्या आधारे कराड हाच मुख्य सूत्रधार असून तो मारेकऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सरकारी पक्षाने पुराव्यानिशी मांडले. कोर्टातील या गंभीर वातावरणामुळे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी होणार आहे. पतीच्या मारेकऱ्यांना जामीन मिळू नये, यासाठी देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.


Categories

Recent Posts