केज – एका शेतकऱ्याने चेकद्वारे बँकेतून अडीच लाखाची रक्कम काढून दोन पिशव्यात ठेवून पिशव्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्या. मेडिकलवरून औषध घेऊन येईपर्यंत अज्ञात चोरट्याने डिक्की उघडून दोन लाख रुपये ठेवलेली पिशवी लंपास केली. तर दुसरी पिशवी तशीच ठेवल्याने ५० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली नाही.
ही घटना केज शहरात घडली. बनकरंजा (ता. केज) येथील शेतकरी महेश शंकर नागरगोजे हे त्यांचे शेजारी उत्तरेश्वर नागरगोजे यांच्या मुलीचे कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी २४ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केजला आले.
महेश नागरगोजे यांनी चेकद्वारे शहरातील एसबीआय बँकेतून अडीच लाख रुपये काढले. त्यांनी दोन लाख रुपये एका पिशवीत व दुसऱ्या पिशवीत ५० हजार रुपये ठेवून दोन्ही पिशव्या दुचाकीच्या (एम. एच. ४४ एएफ ५५५३) डिक्कीत ठेवल्या. त्यानंतर महेश नागरगोजे व त्यांच्या सोबत असलेले उत्तरेश्वर नागरगोजे व त्यांची मुलगी ऋतुजा हे तिघे आईचे औषध आणण्यासाठी बसस्थानकापासून जवळ असलेल्या तांबवेश्वर मेडिकलवर दुचाकी रस्त्यावर उभी करून गेले.
मेडिकलवर गर्दी असल्याने त्यांना औषध घेऊन येण्यास १५ ते २० मिनिटे लागले. तोपर्यंत पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने दुचाकीची डिक्की उघडून डिक्कीत ठेवलेली २ लाख रुपयांची पिशवी घेऊन पोबारा केला. दुसरी पिशवी चोरट्याने तशीच ठेवल्याने ५० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली नाही. महेश नागरगोजे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत.