Breaking
Updated: July 7, 2025
WhatsApp Group
Join Nowकोर्ट 22 जुलै रोजी देणार निर्णय, वकील उज्ज्वल निकम यांची माहिती
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंबंधीची एक याचिका बीड कोर्टात सादर झाली असून, त्यावर येत्या 22 जुलै रोजी निर्णय येणार आहे. त्यामुळे वाल्मीकसह सर्वच आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणासह वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर निकाल देण्यासाठी 22 जुलै ही तारीख निश्चित केली. कोर्ट त्या दिवशी आपला निर्णय देईल.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आजच्या सुनावणीची माहिती दिली. ते म्हणाले, न्यायालय वाल्मीक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर येत्या 22 जुलै रोजी निकाल देणार आहे. सरकारने या प्रकरणातील आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यासंबंधी एक अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद झाला. त्यावरही कोर्ट 22 जुलै रोजी निर्णय देणार आहे. विशेषतः या प्रकरणातील आरोपींनी आपल्या प्रॉपर्टीवर टाच आणली जाऊ नये असे अर्ज केले होते. त्यांच्या अर्जावरीह 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
पत्रकारांनी यावेळी उज्ज्वल निकम यांना वाल्मीक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात येणार आहे का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर बोलताना ते म्हणाले, वाल्मीक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. या प्रकरणी कोर्टात कोणताही अर्ज आला नाही. वाल्मीक सध्या बीड जिल्हा कारागृहातच आहे. वाल्मीकला कोणत्या तुरुंगात ठेवणे अधिक सुरक्षित राहील याबाबत मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे. तुरुंग प्रशासनच यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल. तूर्त याविषयी कोर्टात अर्ज दाखल झाला नाही किंवा कोर्टानेही आमच्याकडे तशी विचारणा केली नाही.
दुसरीकडे, वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे यांनी कोर्टात आपल्या अशिलाच्या चल – अचल संपत्तीला लावलेले सील काढण्याची मागणी केली. आजच्या सुनावणीत आम्ही आमच्या अशिलाच्या चल – अचल मालमत्तेला लावलेले सील काढण्याची मागणी केली. आमच्या अशिलाने सदर बँक खात्यांत असणारी संपत्ती व इतर मालमत्ती कोणत्याही गुन्ह्यातून मिळवली नाही. या गुन्ह्याचा व त्या प्रॉपर्टीचा काहीही संबंध नाही. कोर्टात यावर युक्तिवाद झाला. याशिवाय दोषमुक्तीच्या अर्जावरही सुनावणी झाली. या दोन्ही अर्जावर कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.