Home »
Majalgaon » लाचखोर मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला न्यायालयीन कोठडी
लाचखोर मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला न्यायालयीन कोठडी
माजलगाव : सहा लाखाची लाच घेताना माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला लाचलुचपतने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्याला शुक्रवारी (दि.११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शासनाच्या नगर उत्थान अभियान योजनेअंतर्गत केलेल्या सिमेंट रस्त्याच्या २ कोटीच्या कामातील बिलाबद्दल कमिशन म्हणून ६ लाख रुपये व दुसऱ्या कामातील अडथळे, अतिक्रमण काढून घेण्यासाठी ६ लाख अशी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने गुत्तेदाराकडे १२ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु ही मागणी मान्य नसल्याने तक्रारदार यांनी यासंदर्भातील तक्रार छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाकडे केली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर या विभागाच्या पथकाने गुरुवार (दि.१०) रात्री सापळा रचला. माजलगाव शहरातील पिताजी नगरी येथे किरायाच्या घरी चव्हाण याने सहा लाख रुपयांची लाच स्विकारली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील पथकप्रमुख पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्यासह अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांच्या पथकाने चव्हाणला रंगेहाथ पकडले. त्यावेळी घेतलेल्या घराच्या झडतीत रोख ९४ हजार ८०० रुपयांची रक्कम आढळून आली. त्यानंतर शहर पोलीसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास चंद्रकांत चव्हाण याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता अतिरीक्त सत्र न्यायाधीश राजश्री प.परदेशी यांनी चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. शासनाचे वतीने सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी तर चव्हाण यांच्या वतीने शरद सोळंके यांनी काम पाहिले.
चव्हाण याची १२ तासांनी आरोग्य तपासणीचंद्रकांत चव्हाण यांना गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ आरोग्य तपासणी करणे आवश्यक असताना तसे न करता तब्बल १२ तासांनी म्हणजे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास चंद्रकांत चव्हाण यांना येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन तेथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या बारा तासाच्या दरम्यान चव्हाण यांना पोलीस उपनिरीक्षक माकने जेथे बसतात त्या रूममध्ये त्यांच्या खुर्चीवर बसवण्यात येऊन बडदास्त ठेवण्यात आली. तेथे त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.