Breaking
Updated: July 12, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात झोपलेल्या विधवा महिलेस व तिच्या दिर – सासऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत हातावर ब्लेडने वार केल्याची घटना नारेवाडी (ता. केज) येथे ११ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नारेवाडी येथील सोनाली वसंत उगलमुगले (वय २४) ही विधवा महिला ११ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरात झोपली होती. त्यांचा शेजारी संजिवन उर्फ संजय आश्रुबा उगलमुगले याने त्यांच्या पत्र्याच्या शेडवर दगडे मारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने घरात शिरून सोनाली यांच्या अंगावर बसून चापटाने मारहाण केली. तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिलीस, तुझ्यावर अत्याचार करून तुला मारणार आहे.
तुझ्या दिर व सासऱ्यास मारुन टाकेन, अशी धमकी देत ब्लेडने हाताच्या मनगटावर व दंडावर वार केले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची जाऊ परिमला अनंत उगलमुगले धावून आल्या. त्यांनी त्याला ओढुन बाजुला करीत गळ्याला धरून कानाखाली मारून ढकलुन दिले. तर त्यांच्या पुतनीला गचुरीला धरून ढकलुन दिल्याने तिच्या डोळ्याच्या बाजूला खरचटले. त्यांच्या सासऱ्याने त्याला तू आमच्या घरी कोणी नसताना बायकांना का त्रास देतोस, म्हणताच त्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याचा मुलगा विशाल संजिवन उगलमुगले याने येऊन शिवीगाळ केली. तर अंकुश उगलमुगले याने तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही तुम्हाला जिवेच मारणार, रोज कोयते घेऊन येणार असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सोनाली उगलमुगले यांनी दिल्यावरून संजिवन उर्फ संजय उगलमुगले, विशाल उगलमुगले, अंकुश उगलमुगले या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार राजू वाघमारे करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या गटाचे संजय उगलमुगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आश्रुबा उगलमुगले, अनंत उगलमुगले, सोनाली उगलमुगले, करण सांगळे यांनी जुन्या भांडणाचे कारण काढून काठीने डोक्यात मारून जखमी केले. लाथाबुक्यांनी चापटांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार दिल्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.