परळी : मस्साजोग येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात गाजत असलेल्या महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणाला आता नव्या घडामोडीने वेग आला आहे. मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा पोलिस प्रशासनाला आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आंदोलनही छेडले होते.
या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी परळी येथे जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी मुंडे कुटुंबीय भावनिक झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “एका कुटुंबीयाने सांगितले आहे की मांसाचा तुकडा टेबलवर ठेवत धमकावण्यात आले, असे गंभीर आरोप असूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल २१ महिने उलटले तरीही तपास प्रलंबित आहे. मुख्यमंत्री गुंडांना पाठीशी घालायचे काम करत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.”
यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक (ओएसडी) यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून या प्रकरणावर चर्चा केली. “२५ तारखेपर्यंत या प्रकरणात एसआयटी नियुक्त झाली नाही, तर बीडसह संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या प्रकरणातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
“सरकारकडून आरोपींना अटक झाली पाहिजे” – ज्ञानेश्वरी मुंडे या भेटीनंतर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, “मनोज दादांनी आश्वासन दिले आहे की मुख्यमंत्र्यांशी बोलून २५ तारखेच्या आत एसआयटी व सीआयडीची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच आरोपींना अटक करण्यास सरकारला सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.”
“आता तरी या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल, अशी आशा आहे. आरोपींना अटक झाली नाही, तर दादांनाही महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे. माझ्या माहेर आणि सासरच्या लोकांनी रास्ता रोको आंदोलनाचीही तयारी दाखवली आहे. सरकारने तात्काळ आरोपींना अटक करावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.