Breaking

‘पशु आरोग्य सेवक’ पदासाठीची भरती जाहिरात खोटी; नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

Updated: July 10, 2025

By Vivek Sindhu

नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

WhatsApp Group

Join Now

बीड : ‘पशु आरोग्य सेवक’ या पदासाठी शासनामार्फत भरती होत असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून प्रसारित होत आहे. मात्र, ही माहिती पूर्णतः खोटी असून, सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

या प्रकारच्या खोट्या जाहिरातींच्या माध्यमातून काही लोक आर्थिक फसवणूक करत असून, नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा बनावट जाहिरातींची खातरजमा अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत. सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बनावट जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

तसेच, नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रके व इतर माध्यमांतून प्रचार मोहीम राबवली जाणार आहे. खोट्या भरती जाहिराती देणाऱ्या वेबसाइट्स व मोबाईल क्रमांकांचा शोध घेऊन, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांनी कोणतीही भरती किंवा जाहिरात प्राप्त झाल्यास ती तत्काळ अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच पुढील निर्णय घ्यावा. तसेच, कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीड शहर पोलिसांनी केले आहे.